भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सुरु असलेल्या वादाला गुरुवारी वेगळं वळण मिळालं. विधान भवनाच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही संताप व्यक्त केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही याप्रकरणी संताप व्यक्त करत कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर सभागृहात याच मुद्द्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना त्यांना आलेल्या धमक्यांचा उल्लेख केला. यावरुनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहात की नाही असा सवाल उपस्थित केला.
मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाईची घोषणा केली. “नितीन देशमुख याने जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. तर सर्जेवार टकलेने पडळकरांचा मावस भाऊ असल्याचे सांगितले. अधिकृत पास नसताना यांनी विधानभवनात येऊन मारामारी केली. सभागृहाच्या सदस्यांनी बाहेरच्यांना योग्य नाही. देशमुख आणि टकले यांच्यावर अवमानाची कारवाई करण्यासाठी हे प्रकरण विधानसभा विशेष अधिकार समितीकडे पाठवण्यात यावे, तसेच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांनी या दोघांना विधानभवनात आणल्याप्रकरणी आणि त्यांनी केलेल्या कृतीबद्दल खेद व्यक्त करावा, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.
“धमकीचा उल्लेख करण्याला मनाई नाही. पण अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहात की नाही. तो विषय वेगळा मांडता येईल. ही प्रतिष्ठा कुण्या एका व्यक्तीची नाही. इथे बससेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आज बाहेर ज्या शिव्या पडत आहेत त्या एकट्या पडळकर किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. सगळे आमदार माजले असं आपल्या नावाने बोललं जातं. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करुन आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.



