पुणे : वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र विलास गायकवाड यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. पोलिसांना त्यांच्या घरी कोणतीही चिठ्ठी मिळाली नसून त्यांच्या या कृत्यामागील कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुले आहेत.
राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२, रा. डी वाय पाटील कॉलेज मागे, धानोरी, लोहगाव) हे सध्या वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात सेवेला होते. शनिवारी त्यांची साप्ताहिक सुट्टी होती. त्यामुळे ते घरीच होते. त्यांची पत्नी दौंडला गावी गेली होती. त्यांची १२ व १४ वर्षाचे मुलगा व मुलगी सकाळी शाळेत गेले. त्यांची पत्नी त्यांना फोन करत होती. पण ते फोन उचलत नव्हते.
त्यांची मुले दुपारी घरी परत आले. घर बंद असल्याचे त्यांनी शेजारांना कळविले. त्यानंतर पोलीस आल्यावर त्यांनी दरवाजा उघडला असता राजेंद्र गायकवाड यांनी घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याचे दिसून आले. त्यांच्या या कृत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. विमानतळ पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.