पिंपरी : निगडी प्राधिकरण परिसरातील चंद्रविले बंगल्यात चोरट्याने एक धक्कादायक प्रकार केला. उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बंधक बनवून त्यांच्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्याने जवळपास अर्धा तास त्यांना बंधक ठेवून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रसंगावधान राखत गॅलरीत जाऊन आरडाओरड केली आणि आपला जीव वाचवला.
निगडी पोलिसांची तत्काळ कारवाई
माहिती मिळताच निगडी पोलीस स्टेशनचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसराला चारही बाजूंनी वेढा घालण्यात आला. परंतु, तोपर्यंत चोरटे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले होते. पोलिसांनी त्या ज्येष्ठ नागरिकांची सुखरूप सुटका केली असून, या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंता वाढली
या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. उच्चभ्रू वसाहतीतही अशी घटना घडल्यामुळे निगडी प्राधिकरणातील सुरक्षेच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
पोलिसांकडून अपील
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.