पिंपरी चिंचवड | २१ जुलै २०२५
डेंग्यू, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आणि जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवत प्रभावी कारवाई केली आहे. शहरातील विविध भागांतील ५ लाख ४३ हजार ७६६ घरे, २८ लाख ९३ हजार ९३४ कंटेनर, १,२३८ भंगार दुकाने व १,६०९ बांधकाम स्थळांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान ३,४३१ ठिकाणी डास उत्पत्तीला पोषक परिस्थिती आढळून आली, त्या ठिकाणी महापालिकेने नोटिसा बजावल्या. त्याचबरोबर ६२४ नागरिक व व्यावसायिकांवर थेट दंडात्मक कारवाई करत तब्बल २२ लाख २४ हजार रुपयांची दंडरक्कम वसूल करण्यात आली आहे.
ही मोहिम महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबवली जात आहे.
महापालिकेने औषध फवारणी, घरांतील पाण्याचे साठे व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने व बांधकाम स्थळांची पाहणी, तसेच जनजागृती आणि कडक दंडात्मक कारवाई अशा सर्वसमावेशक उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या आहेत.
शहरात डासांचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी महापालिकेचा सततचा प्रयत्न सुरू असून, नागरिकांनीही आपापल्या परिसरात स्वच्छता राखून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




