वाकड | प्रतिनिधी, २३ डिसेंबर २०२५
राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशानंतर वाकड परिसरातील भाजपमध्ये अस्वस्थता आणि अंतर्गत धुसफूस उघडपणे समोर येऊ लागली आहे. कलाटे यांच्या दलबदलू भूमिकेमुळे भाजपमधील जुने पदाधिकारी आणि इच्छुक नेते अस्वस्थ झाले असून, त्यांच्या विरोधात उघड भूमिका घेणारा नाराजांचा स्वतंत्र गट तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
विशेष म्हणजे, यापूर्वी राहुल कलाटे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणारे भाजपचे शहर उपाध्यक्ष विनायक गायकवाड, राम वाकडकर, अतुल ढवळे, विशाल आप्पा कालाटे आणि कुणाल व्हावळकर हे सर्व नेते आता पुन्हा एकत्र आले असून, भाजपमधील वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत वाकड प्रभागात ‘राहुल कलाटे विरुद्ध सर्व’ असेच चित्र राहणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
पक्षांतरांची लांबच लांब यादी…
राहुल कलाटे यांची राजकीय वाटचाल ही सातत्याने पक्ष बदलणारी राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपासून सुरुवात करत त्यांनी अपक्ष, शिवसेना, पुन्हा अपक्ष, वंचित बहुजन आघाडी, मनसेचा पाठिंबा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आणि आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर थेट भाजपमध्ये प्रवेश असा प्रवास केला आहे. केवळ राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाणे एवढाच टप्पा त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अंतिम ध्येय राहिला असल्याची टीका उघडपणे केली जात आहे.
विकासाकडे दुर्लक्ष, नागरिकांत नाराजी..
मागील नऊ वर्षांत प्रभागातील कोणत्याही ठोस विकासकामांना प्राधान्य न दिल्याचा आरोप राहुल कलाटे यांच्यावर नागरिक आणि सोसायटीधारकांकडून केला जात आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष झाल्याने अनेक गृहनिर्माण संस्था नाराज आहेत. आता तेच कलाटे भाजपमध्ये आल्यामुळे ही नाराजी हळूहळू संघटित रूप धारण करत असल्याचे चित्र दिसत आहे.
स्वार्थासाठी पक्षांची होळी?
स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी सातत्याने पक्ष बदलणाऱ्या नेत्यांबद्दल सामान्य मतदारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे जाणवत आहे. पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ भाजपचा झेंडा हाती घेतला, अशी भावना मतदारांमध्ये रुजत चालली आहे. या धरसोड वृत्तीचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत कलाटे यांना बसू शकतो, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
एकीकडे भाजपची संघटनात्मक ताकद, तर दुसरीकडे अंतर्गत नाराजी आणि नागरिकांचा रोष या दुहेरी आव्हानांमध्ये राहुल कलाटेंची पुढील राजकीय वाटचाल कसोटीवर लागली आहे. वाकड प्रभागात ही लढत केवळ पक्षांची नव्हे, तर विश्वास विरुद्ध स्वार्थ अशीच ठरणार का, याकडे सर्व शहराचे लक्ष लागले आहे.




