पिंपरी, २६ डिसेंबर – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या टिकिट वाटपाच्या तोंडावर थेरगाव येथील प्रभाग क्रमांक २३ मधून उमेदवारीसाठी तयारी करणाऱ्या शिक्षण समितीच्या माजी सभापती मनीषा पवार यांना मोठा धक्का बसला आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपकडून निवडून आलेल्या पवार यांच्या जन्मदाखला आणि जातीप्रमाणपत्रात गंभीर तफावती असल्याचे उघड झाले आहे.
यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, प्रभागातील नागरिकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.पवार यांच्या कागदपत्रांमध्ये जन्मतारखेवर शंका घेतली जात आहे. पॅनकार्डवर १ जून १९८० ही तारीख नमूद आहे, तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ६ जून १९८४ अशी वेगळी तारीख आहे. शाळा प्रवेश १३ जून १९९६ असून, तीन महिन्यांतच ३० सप्टेंबर १९९६ ला शाळा सोडल्याचा उल्लेख आहे. आठवीपर्यंत शिकल्याचा दावा असूनही हा दाखला बनावट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जाती प्रमाणपत्राबाबत आणखी गंभीर आरोप आहेत. त्यांच्या वडिल सुनिल सुर्यवंशी यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ‘हिंदू-बौद्ध’ असा उल्लेख आहे, तर पवार यांच्या जातीप्रमाणपत्रावर ‘महार’ आणि शाळा दाखल्यावर ‘हिंदू मांग’ असे विरोधाभासी नमूद केले आहेत. खोट्या जातीचे प्रमाणपत्र देत प्रभागातील समाजाची फसवणूक केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.प्रभागातील नागरिकांनी या फसवणुकीविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. भाजपने खोट्या कागदपत्रांवर आधारित उमेदवार लादू नयेत, त्यांच्यावर कारवाई करून निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी प्रसिद्धी माध्यमांना निवेदन देण्यात आले असून, त्यावर शेकडो नागरिकांनी सह्या केल्या आहेत.निवडणुकीच्या तोंडावर पवार यांच्या अडचणी वाढल्या असून, पक्ष आणि आयोग स्तरावर कारवाईची अपेक्षा आहे. याचिकेचा निकाल सर्वांचे डोळे टिपले आहेत.




