पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने राजकीयदृष्ट्या निर्णायक मास्टरस्ट्रोक करत आमदार समर्थक, सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांचा जाहीर पक्षप्रवेश करून घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशासोबतच अनुसूचित जाती प्रवर्गातून मारुती जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने प्रभागातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत.
फुलेनगर, घरकुल व शरदनगर परिसरात मोठा मित्रपरिवार, मजबूत जनसंपर्क आणि निस्वार्थ सामाजिक सेवेमुळे निर्माण झालेली विश्वासार्ह ओळख हे मारुती जाधव यांचे बलस्थान आहे. घरकुलमधील स्थानिक उमेदवार असल्यामुळे प्रभागातील नागरिक त्यांना प्रथम प्राधान्य देतील, असा विश्वास व्यक्त केला जात असून त्यामुळे राष्ट्रवादीच्या पॅनलची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे मानले जात आहे. या घडामोडीमुळे मतदारांमध्येही सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
मारुती जाधव हे कोणत्याही राजकीय घराण्यातून आलेले नसून, सामान्य व कष्टकरी कुटुंबात वाढलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या आईने धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत मुलांचे शिक्षण पूर्ण केले. अशा प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत मारुती जाधव यांनी ॲम्बुलन्स चालक म्हणून काम करत अपघात, आजार व आपत्कालीन प्रसंगी असंख्य गरजू नागरिकांना वेळेवर मदत केली.
“फोन आला की धावून जाणारा कार्यकर्ता” अशी मारुती जाधव याची ओळख संपूर्ण प्रभागात असून, जात–धर्म–पक्ष न पाहता मदतीला धावून जाणारा माणूस म्हणून त्यांना सर्व स्तरातून मान्यता मिळाली आहे. दरम्यान, या निवडणुकीत चिखलीतून आलेल्या आयात उमेदवारांविरोधात स्थानिक, गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार अशी थेट व तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. एकीकडे पैसा, ताकद आणि आयात चेहेरे, तर दुसरीकडे संघर्ष, सेवा आणि जनतेतून उभा राहिलेला उमेदवार अशी ही लढत प्रभाग ११ मध्ये राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
एकंदरीतच, अनुभवी, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि मजबूत जनसंपर्क असलेला पॅनल उभा करत राष्ट्रवादी काँग्रेसने “सामान्य माणूसही नेतृत्व करू शकतो” हा स्पष्ट व ठोस राजकीय संदेश दिला असून, आगामी महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता अधिक बळावली आहे.




