पिंपरी-चिंचवड : जनशक्ती
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपमध्ये तिकीट वाटपावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून, उपयोगी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा उपद्रवी व संधीसाधू लोकांना जवळ केल्याचा आरोप शहरातील भाजप नेतृत्वावर होत आहे. विधानसभेतील भाजप आमदारांनी तिकीट वाटप करताना इतर पक्षातून आलेल्या लोकांना प्राधान्य दिल्याने, पक्षासाठी वर्षानुवर्षे राबणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
भाजपच्या अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघात शांतता राखण्यासाठी आणि संभाव्य विरोध टाळण्यासाठी वादग्रस्त, उपद्रवी प्रवृत्तीच्या नेत्यांना उमेदवारी देऊन ‘सेटिंग’ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. मात्र, या प्रक्रियेत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले, निवडणुकीत जीव ओतणारे आणि संघटन मजबूत करणारे कार्यकर्ते मात्र अक्षरशः कात्रजचा घाट दाखवून बाजूला सारले गेल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
या अन्यायकारक तिकीट वाटपामुळे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संयम सुटण्याच्या मार्गावर असून, अनेक ठिकाणी संतप्त कार्यकर्ते आमदारांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. “आम्ही पक्ष वाढवण्यासाठी रस्त्यावर उतरलो, संघर्ष केला; पण निवडणुकीच्या वेळी बाहेरून आलेल्यांना लाल गालिचा घातला जातो,” असा थेट संताप व्यक्त केला जात आहे.
पक्षांतर्गत चर्चा आता दबक्या आवाजात न राहता उघडपणे सुरू झाली असून, “उपद्रवी लोकांना जवळ करून शांतता विकत घेण्याचा हा प्रकार भाजपसाठी आत्मघातकी ठरेल,” अशी प्रतिक्रिया अनेक वरिष्ठ कार्यकर्त्यांकडून येत आहे. निष्ठा, काम आणि योगदान याला डावलून केवळ गणिती राजकारण केल्याने भाजपच्या संघटनात्मक बांधणीला मोठा धक्का बसल्याचे चित्र सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये दिसत आहे.
एकीकडे भाजप नेतृत्व ‘संघटना मजबूत असल्याचा’ दावा करत असताना, दुसरीकडे तिकीट वाटपामुळे निर्माण झालेला असंतोष, बंडखोरीची शक्यता आणि मोर्चांची तयारी यामुळे भाजपसमोरील अंतर्गत आव्हान अधिक तीव्र होत असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी काळात या नाराजीचा निवडणूक निकालावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




