पिंपरी : २ जानेवारी २०२६
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका म्हणजे लूट, दलाली आणि ठेकेदारांचे अभयारण्य बनले असून या भ्रष्टाचाराच्या राक्षसाचे दहन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आणि महापालिकेतील भ्रष्टाचाराचा भंडाफोड करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
ज्यांनी आमच्यावर मूर्ती घोटाळ्याचे आरोप केले, त्याच लोकांना भाजपने उमेदवारी दिली. हे राजकारण नाही, ही जनतेच्या बुद्धीची थट्टा आहे. माझ्यावर ७० हजार कोटींचे आरोप झाले, पण आरोप करणारेच आज माझ्यासोबत सत्तेत आहेत. सत्य कोणाचे होते, हे जनता ओळखते, असे अजित पवार ठामपणे म्हणाले.
‘ना भय.. ना भ्रष्टाचार’चा फसवा मुखवटा
“ना भय, ना भ्रष्टाचार” म्हणत सत्तेत आलेल्यांनी महापालिकेत लूट, कमिशन आणि टक्केवारीचा कारखाना उभा केला आहे. शहरातील प्रत्येक विकासकाम भ्रष्टाचाराने बरबटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत नव्या, स्वच्छ आणि निर्भीड चेहऱ्यांना संधी दिली असून महिलांची सुरक्षा, नागरिकांचे जीवनमान आणि शहराचा सन्मान हे आमचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाहतूक कोंडीचा नरक, सत्ताधाऱ्यांचे मौन
“पूर्वी पिंपरी–चिंचवड एका टोकाहून दुसऱ्या टोकाला १० मिनिटांत पार होत होते. आज नागरिकांना एका तासाची शिक्षा भोगावी लागते. उड्डाणपूल, मेट्रो पार्किंग, ट्रॅफिक प्लॅनिंग कुठे आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अल्पसंख्यांक उमेदवारांना धमक्या, पैशांचे आमिष आणि दबाव टाकण्याचे प्रकार सुरू असून लोकशाहीला गुंडगिरीने गुदमरवले जात आहे. “दादागिरी सहन केली जाणार नाही. नोंद प्रवृत्तीच्या लोकांना जनता खड्यासारखे बाजूला फेकल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
पवना, इंद्रायणी आणि मुळा–मुठा नद्यांमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट सोडले जात आहे. कामे कागदावर, पैसे खिशात आणि काही अधिकारी या लुटीचे भागीदार बनले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
- पिंपरी–चिंचवड महापालिका : भ्रष्टाचाराची जळती यादी
- जॅकवेल प्रकल्पात उघड लूट
- कुदळवाडी कारवाईत लघुउद्योगांचा बळी
- प्राणीसंग्रहालय ठेकेदारांसाठी सोनेरी खाण
- स्मार्ट सिटी घोटाळा
- तांत्रिक मान्यता न घेता २५० कोटींची कामे
- ५०० किमी ऐवजी ७५० किमी खोदाईचा बनाव
- सफाई कामगारांचे वेतन गिळंकृत – २०२१ मध्ये गुन्हा दाखल
- कचऱ्यातही भ्रष्टाचार – ‘बायोमायनिंग’च्या नावाखाली ४५.९२ कोटींची लूट
- मोबाईल टॉवर घोटाळा – परवाना व कर विभागाची संगनमत
- लॉकडाऊन काळात कुत्र्यांच्या नसबंदीवर हात साफ
- अर्बन स्ट्रीट : विकास नव्हे, दलालांची शेती
- सव्वा किमी रस्त्यासाठी ८१ कोटींची उधळपट्टी
- मुळा नदी सुधार प्रकल्पात ३०० कोटी
- पिंपरी–निगडी अर्बन स्ट्रीटसाठी २०० कोटी
- स्वच्छतेच्या निविदा कागदावर, शहर धुळीत
- पारदर्शकतेचा बोजवारा, राज्याचा वचक शून्य
“पिंपरी–चिंचवडमध्ये लुटारू गॅंग राज्य करत आहे. या भ्रष्टाचारी राक्षसाचे दहन करण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. जनतेचा एकच कौल हवा आहे, लुटीविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध! एकत्र या असे आवाहन अजित पवार यांनी केले.




