
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र आल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही समाधान वाटेल, असे वक्तव्य खासदार निलेश लंके यांनी रविवारी (दि. ४) केले. वाकड येथे पत्रकारांशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत विचारले असता त्यांनी ही भूमिका मांडली.
सध्या पिंपरी चिंचवड शहरासह राज्यामध्ये महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढत आहे. याबाबत विचारले असता खासदार लंके म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून तो शरद पवारांचा परिवार आहे. राजकीय कालखंडात हा परिवार जर एकसंघ राहिला तर त्याचा आनंदच होईल. राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी सुख-दुःखात हे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकत्र राहिले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा विकास हा शरद पवार यांच्या नेतृत्वामुळे झाला असून अजित पवारांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्यास हा निर्णय सर्वसामान्य नागरिकही स्वीकारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजकारण हे क्षणाक्षणाला बदलत असते. त्यामुळे कोणतेही ठाम भाकीत करता येत नाही. वाट पाहू आणि बघू, असे सांगत लंके यांनी पुढील काळात राजकीय समीकरणे बदलू शकतात, असे संकेत दिले.




