भोसरीत पैशांचा पाऊस
महापालिका निवडणुकीत मतदारांची चांदी
पिंपरी, (प्रतिनिधी) – तब्बल नऊ वर्षांनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. राज्यामध्ये महायुतीत सत्तेत सहभागी असलेले भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शहरामध्ये एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. एकमेकांच्या विरोधात कुरघोड्यांचे राजकारण सुरू असून सत्ताधारी पक्षाने यंत्रणाना हाताशी धरून मतदारांना पैशांचे वाटप सुरू केले आहे.
२०१७ साली भाजपाने महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर २०२२ पासून महापालिकेवर प्रशासकय राज आहे. आता पुन्हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. या निवडणुकीमध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे. त्यामुळे भाजपावासियांची पळता भुई थोडी झाली आहे. तर, नुकतीच अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आठ वर्षांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचल्याने भाजप नेत्यांसमोर अंधारी आल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजित पवारांच्या या आरोपांना एकाही स्थानिक नेत्याने उत्तर देण्याचे धाडस दाखवले नाही.
पवार यांनी स्वतः लक्ष घातल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पॅनल तगडे झाले आहेत. विजयी होतील असे उमेदवार दिल्याने भाजपच्या पॅनलसमोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात भाजपच्या अनेकांनी पैशांचा पाऊस पाडायला सुरूवात केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिवसाढवळ्या पैशांचे वाटप केले जात आहे. सोसायट्यांमध्ये राजरोसपणे व्होटर स्लिपसोबत पैसे दिले जात आहेत. याकडे निवडणूक विभाग व पोलिस यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.




