चक्क शाळेच्या मैदानात प्रचाराच्या गाड्या

पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक सुरू असताना थेरगाव येथील प्रेरणा शिक्षण संस्थेच्या शाळेच्या परिसरात प्रचाराच्या गाड्या उभ्या केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या मैदानाचा प्रचारासाठी वापर होत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
निवडणूक प्रचारासाठी लावण्यात येणाऱ्या वाहनांमधून मोठ्या आवाजात घोषणा, गाणी व भाषणे सुरू असतात. त्यामुळे वर्गातील अभ्यासात व्यत्यय येत असून विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत आहे. शाळेच्या मैदानात प्रचाराची वाहने उभी राहत असल्याने मुलांच्या खेळण्यावरही मर्यादा येत असल्याची तक्रार पालक व शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
निवडणूक आचारसंहिता लागू असताना शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अशा प्रकारे प्रचार करणे नियमबाह्य असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. शाळा हे शांततेचे व शिक्षणाचे केंद्र असताना तेथे राजकीय प्रचारासाठी जागा वापरणे चुकीचे असल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणाकडे निवडणूक निर्णय अधिकारी व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, तसेच शाळा परिसरात प्रचार वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही काही पालकांनी दिला आहे.




