पिंपरी | प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेचा प्रचार जोरात; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तिरंगी लढतीत शिवसेनेचे पारडे जड?
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट होत असून, मामुर्डी, किवळे, रावेत, गुरुद्वारा व वाल्हेकरवाडी परिसरात प्रचार दौरे जोरदार रंगत आहेत. जुन्या व नव्या नेतृत्वांचा समतोल साधत शिवसेनेच्या पॅनलकडून घरदारात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर असून, विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत महिलांना दिली जाणारी माहिती हा मोठा आकर्षणबिंदू ठरत आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता महिलांकडून शिवसेनेला मिळणारा पाठिंबा अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ (अ), ऐश्वर्या तरस (ब), सौ. रेश्मा बापूजी कातळे (क) आणि निलेश तरस (ड) यांनी सोसायटी टू सोसायटी व घर भेटीद्वारे धनुष्यबाण चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे जोरदार अभियान हाती घेतले आहे. किवळे परिसरात महिलांचा रेश्मा बापूजी कातळे आणि बापूजी कातळे यांच्यावरील विश्वास, तसेच शिवसेना नेतृत्वावर असलेला विश्वास स्पष्ट दिसून आला. अनेक ठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत करत विजयी होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
प्रचारादरम्यान उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले असून ‘खीच केताण धनुष्यबाण’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसत असून, १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेला भरघोस मतदान करू, अशी भूमिका अनेक मतदारांनी व्यक्त केल्याचे पक्ष कार्यकर्ते सांगतात.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या महायुतीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये तिरंगी लढत चुरशीची होत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेला आहे. काही ठिकाणी समन्वय साधला असला तरी रावेत परिसरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पॅनेलसमोर समांतर लढत उभी राहिल्याने सामना अधिक रंगत चालला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या युवा नेतृत्वाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता प्रभागात शिवसेनेचे पारडे सध्या जड असल्याचे राजकीय समीकरण दर्शवत आहे.



