चिखली | प्रभाग क्रमांक १
चिखली-मोरेवस्ती परिसरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चार सक्षम नेतृत्वांना संधी देण्यात आली आहे. विकास साने, संगीता ताम्हाणे, यश साने आणि साधना काशीद हे उमेदवार मैदानात असून पक्षाकडून संघटित नेतृत्वासोबत विकासाभिमुख दृष्टीकोनाचा संदेश दिला जात आहे.
या प्रभागाची ओळख स्वर्गीय दत्ताकाका साने यांच्या प्रभावी कार्यकाळामुळे भक्कम झाली होती. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर परिसर काही काळ खरोखर पोरका झाल्याची भावना नागरिकांमध्ये होती. मात्र, त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत विकास साने आणि यश साने यांनी समाजकार्य, नागरिकांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि समस्यांसाठी लढण्याची भूमिका यामुळे प्रभागाला “नवीन काका रूपी श्रावण बाळ” मिळाल्याची भावना नागरिक व्यक्त करताना दिसतात.
सामान्यपणे आजकाल दोन मुलांचे संगोपन करतानाही नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागतो. अशा काळात “विकास सोशल फाउंडेशन”च्या माध्यमातून १०० मुलांचे संगोपन, शिक्षण, नोकरी आणि लग्नाची जबाबदारी स्वीकारून ती प्रत्यक्ष काम पूर्ण करण्याचे कार्य विकास साने यांनी केले. सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या प्रेरणेने त्यांनी ही समाजसेवा सुरू केली असल्याचे सांगितले जाते.
कोविडसारखी भीषण महामारी असताना विकास साने यांनी घरात न बसता स्वतःच्या ३० हजार स्क्वेअर फूट वेअर हाऊसमध्ये अत्याधुनिक कोविड सेंटर उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र महापालिकेने परवानगी नाकारल्याने नागरिकांच्या सेवेसाठी मोठ्या पातळीवर काम करण्याचा निर्णय घेत त्यांनी निवडणूक क्षेत्रात उडी घेतली.
प्रभागातील नागरिकांसाठी २४ तास सेवा, समस्यांचे निराकरण, तसेच ५० हजार नागरिकांना काशी आणि विविध तीर्थक्षेत्र दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासारख्या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि आत्मीयता वाढताना दिसते.
यामुळेच प्रभाग क्रमांक १ मध्ये स्व. दत्ता दादा साने यांच्या नंतर विकास साने हेच खऱ्या अर्थाने प्रभागाचे दातृत्व स्वीकारणारे “श्रावण बाळ” ठरत असल्याचे नागरिक खुलेपणाने व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रभागातील निवडणूक लढत अधिकच रंगत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळणाऱ्या जनसमर्थनामुळे राजकीय वर्तुळातही विकास साने यांच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा सुरू आहे.




