कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आव्हान पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्विकारले आहे. गेल्या पन्नास वर्षांत काँग्रेसने काय केले हे जाहीरपणे बिंदू चौकात येऊन सांगू असेही सतेज पाटील यांनी म्हटले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी सुरुच आहेत. या निवडणूकीला आता वेगळाच रंग चढत आहे.
राज्यात ५० वर्षे काँग्रेसची सत्ता होती. कोल्हापूरसाठी काँग्रेसने काय केले, याचा हिशोब बिंदू चौकात जाहीरपणे द्या असे आव्हान चंद्रकांतदादांनी २३ मार्च रोजी सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सभेत बोलताना केले होते. यानंतर पाईपलाईन आणि शहराची हद्दवाढ, अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याचे काम अशा अनेक मुद्यावरून सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पालकमंत्र्यांनीही याला सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.