मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीतील नेत्यांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मात्र रविवारी राज ठाकरे यांच्या नियोजित दौरा ठरला होता. त्यानंतर अचानक त्या दौऱ्यामध्ये बदल करत नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या अचानक भेटीमुळे राजकीय क्षेत्रातील सस्पेन्स वाढला आहे. तसेच अनेक चर्चांना उधाण देखील आले आहे. या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही.
या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे मनसे भाजप युती होणार का? असे प्रश्न अनेकांना पडू लागले आहेत. तसेच या भेटीनंतर महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून तसेच भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या भेटीवर नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईची प्रकृती बघायची होती. तसेच त्यांनी नवीन घर पहायला मला बोलवलं होतं.
म्हणून मी आज त्यांच्याकडे भेटायला आलो. परवा मंगेशकरांना जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा ते म्हणाले एकदा घरी या. घर आम्ही नवीन बांधलंय तेही बघाल आणि आईशीही भेट होईल, म्हणून मी त्यांना भेटायला आलो. या भेटीचा राजकारणाशी काहीच संबंध नाही. ही पूर्णपणे व्यक्तीगत आणि पारिवारीक भेट होती. त्यांचे माझे संबंध गेल्या तीस वर्षांपासून आहेत. त्यामुळे आजच्या भेटीचा राजकारणाशी कुठलांही संबंध नाही असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.
तसेच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अशा भेटी फक्त वयक्तीक भेटी नसतात. अशा भेटीत ही राजकीय चर्चा ही होतच असते. त्यामुळे भविष्यात भाजप आणि मनसेची सकारात्मक चर्चा होऊ शकते. कारण राज ठाकरेंनी शिवतीर्थावर हिंदुत्वाची घेतलीली भूमिका ही आमच्याशी जुळणारी भूमिका आहे. असे दरेकर म्हणाले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात मनसेसोबत युतीचा प्रस्ताव आल्यास त्याबाबत आमच्या कोर कमिटीत चर्चा होईल, मगच काय तो निर्णय घेऊ असे ते म्हणाले आहेत.



