राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशीदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे पक्षालाच फटका बसण्याची चिन्हं दिसत आहेत. याच कारणामुळे मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये मी माझ्या प्रभागामध्ये हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावणार नाही असं सांगितलं आहे. मात्र त्यावेळी त्यांनी आपण राज ठाकरेंवर किंवा पक्षावर नाराज नसल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर आपण नेमकी काय भूमिका घ्यावी याबद्दल फार संभ्रमात असल्याचंही मोरेंनी बोलताना म्हटलं आहे.
पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढलीय का असा प्रश्न वसंत मोरेंनी विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “मी एक क्लिअर करतोय की माझी राज ठाकरेंवर किंवा पक्षावर कुठलीही नाराजी नाहीय. पण राजसाहेबांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलंच नाही,” असं सांगितलं.
पुढे बोलताना मोरे यांनी, “राज ठाकरेंनी जो शब्द वापरला तो, ‘जर मशीदींवरील भोंगे काढले नाही तर..’ असा होता. मी स्टेजवर होतो, मी भाषण ऐकलं आहे. तर भोंगे कुणी काढायचे आहेत. सरकारने भोंगे काढायचेत. सरकारने आधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी,” असं म्हटलंय. आम्ही आमच्या प्रभागांमध्ये भोंगे न लावता शांतता राखण्याला प्राधान्य देणार असल्याचं वसंत मोरेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे.