बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील तलाव सुशोभीकरण व प्राचीन गणेश मंदिर सभागृहाच्या बांधकामासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत एक कोटी ६६ लाख ३२ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.
या मंजूर झालेल्या निधीचा आणि त्या जागेचा पुरेपूर आणि सार्थ उपयोग करुन घ्यायचा असेल तर बोर्लीपंचतन गावाचा विस्तार व लोकसंखेचा विचार करता येथील नागरिकांसाठी एकही विरंगुळ्याचे ठिकाण नाही त्यामुळे या तलाव परिसराराचे सुसज्य प्रेक्षणीय स्थळात रुपांतर केले तर या ठिकाणी निर्माण केलेल्या सुविधांमुळे सध्याच्या धकाकीच्या जिवनातून आपल्या कुटुंबासह थोडा वेळ विरंगुळा व मनोरंजनासाठी गावातील नागरिकांना एक हक्काचे आकर्षक स्थळ उपलब्ध होईल.
यासाठी या संपुर्ण परिसराची स्वच्छता व अधिकृत मोजणी करुन त्यामधे जर अतिक्रमणे असतील तर ती हटवून जागेला कुंपण घातले तर संपुर्ण जागेचा पुरेपूर वापर करता येईल त्याचबरोबर पावसाळ्यात शंकर मंदिर रस्त्याकडून किंवा अन्य ठिकाणांहून येणाऱ्या पाण्याचा कायमस्वरुपी योग्य बंदोबस्त करुन तलावातील सर्व माती आणि साठलेला कचरा काढून तो तलाव पुनर्जिवीत करुन त्यात कारंजे व तलावाच्या काठावर सुरक्षेची काळजी घेऊन बसण्यासाठी कठडे,छोट्या मुलांसाठी बालोद्यान,जेष्ठ नागरिकांसाठी आकर्षक आसनव्यवस्था, जाॕगींग ट्रॕक व इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक नक्षत्राचा नावाच्या वृक्षांची लागवड व त्याची माहीती लावून एक स्वतंत्र नक्षत्रवन उभारले तर हा एक अनोखा उपक्रम होऊ शकतो.
जेणेकरून नक्षत्र आणि वृक्षांचा संबंध लोकांना कळेल.या तलाव परिसरात असणाऱ्या पाचही विहिरींना बारमाही पाणी असते सध्यातरी नित्यनेमाने या पाण्याचा उपयोग होत नसला तरी ज्या वेळी काही कारणाने पाणी पुरवठा खंडित होतो अशा वेळी कपडे धुण्यासाठी महिला या विहिरीच्या पाण्याचा वापर करतात म्हणून या विहीरींमधील गाळ काढून त्याची स्वच्छता करुन दोन विहिरींजवळ कपडे धुण्यासाठी एक घाट व उंच स्टॅन्ड बनवून त्यावर एक पाण्याची टाकी बसवली तर महिलांना ते पाणी विनासायास मिळू शकेल.
या सर्व गोष्टींचा अभ्यासपुर्वक विचार व या विषयातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते नियोजन करुन तलाव परीसराचे सुशोभीकरण त्याचबरोबर गणपती मंदीराचे प्राचीन धर्तीवर बांधकाम केले तर गावामध्ये पर्यटनस्थळ विकसित होण्याबरोबरच गावाच्या सौंदर्यात भर पडण्यास मदतच होणार आहे त्याचबरोबर स्थानिकांना काही प्रमाणात रोजगाराचीसुध्दा संधी निर्माण होईल व खासदार सुनिल तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांनी महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून या कामासाठी मंजूर करुन आणलेल्या निधीचा योग्य विनियोग होऊन सर्वार्थाने सार्थकी लागल्याचे समाधान लाभेल.



