राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी काही आंदोलकांनी शरद पवारांच्या निवासस्थानाच्या दिशेने चपला देखील भिरकावल्याचं दृश्यांमधून दिसून आलं. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून नेतेमंडळी या प्रकारावर प्रतिक्रिया देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
याच्यामागचा मास्टरमाईंड कोण आहे?
जे काही सिल्व्हर ओकवर घडलं, ती आपली शिकवण नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. “कुणाच्याच बाबतीत असं घडता कामा नये. मग तो आमचा सर्वसामान्य नागरीक असेल, तो कुठल्याही पक्षाचा असेल किंवा स्वतंत्र विचारांचा असेल. ही आपली सगळ्यांची परंपरा, शिकवण आहे. असं असताना हे जे काही घडलंय, याच्यामागे निश्चितपणे शेवटपर्यंत जाऊन दूध का दूध, पानी का पानी दाखवून देऊ”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “याच्यामागचा मास्टरमाईंड कोण आहे? कोण चिथावणीखोर भाषणं देत होतं?” असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थित केला आहे.



