मुंबई : शुक्रवारी शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल्या आक्रमक आंदोलनावेळी पोलीस अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावरून आता मुंबई पोलीस दलात मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना तिथून हटवण्यात आले आहे. तर त्यांच्या ठिकाणी निलोत्पल यांची नियुक्ती विश्वास नांगरे-पाटील यांनी केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई पोलीस काय करत होते, मुंबई पोलिसांना कशी माहिती मिळाली नाही. पोलीस खातं सपशेल अपयशी ठरले असल्याचे विरोधकांबरोबरच खुद्द अजित पवार यांनीही म्हटलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. राज्याचे गृहखाते हे सध्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील-यांच्याकडेच आहे. त्यात हे खातं राष्ट्रवादीकडे असून पोलीस प्रशासन एवढं गाफील राहिलं आणि हे आंदोलन पवारांच्या घरापर्यंत पोहोचलं त्यावरून ही टीका होत होती.


