महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत केलेल्या भाषणात अनेक राजकीय नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना आणि राष्ट्र्रवादीवर जहरी टीका केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोंग्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी या भाषणात समाचार घेतला आहे. राज ठाकरेंना फार महत्व देऊ नका, योग्य वेळी त्यांना उत्तर देऊ, अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
राज ठाकरेंना फार महत्व देऊ नका. आपल्याकडे राज्य ठाकरेंच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असून योग्य वेळ आल्यावर त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर देऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे ते म्हणाले, मी आज आमचे नेते धनंजय मुंडे यांच्या तब्यतेची विचारपूस करायला आलो आहे. कुणी काही बोलत असेल तर त्याला फार महत्व देऊ नका, माझ्या दृष्टीनं आज धनंजय मुंडे यांची तब्येत महत्वाची आहे. मी त्यांना भेटायला आलो आहे. मी योग्य वेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, काल ठाणे येथे बोलत असताना त्यांनी मंत्री आव्हाड, मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळं ते धर्माकडं नास्तिकतेनं पाहतात. ते धर्म-बिर्म, देव-बिव काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीनं राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. हेच लोक ईडीच्या कारवाईला घाबरतात. मला ईडीच्या कारवाईला घाबरून ट्रॅक बदलल्याचे म्हणतात. मी ईडीला घाबरत नाही. कोणत्याही कारवाईला समोर जाण्यास तयार आहे. काही चुकीचे केलं नाही तर घाबरण्याची गरजच नाही, असे म्हणत त्यांनी राऊतांच्या टीकेला प्रतित्त्यर दिले आहे.

