कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा १६ एप्रिल रोजी संपन्न झाली. मात्र कोल्हापुर जिल्ह्यासह राज्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीही चर्चा जास्त झाली. हनुमान जयंती, गुड फ्रायडे अशा यात्रा काळात सलग सुट्ट्या असल्याने भाविकांची संख्या लक्षणीय होती. गेली दोन वर्ष करोनामुळे जोतिबा यात्रेवर निर्बंध लादले होते. यावर्षी करोना रुग्णांत लक्षणीय घट झाल्याने यंदा जोतिबा यात्रेवरील सर्व निर्बंध हटवले त्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

यंदा यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक आले होते. यात्रेसाठी भाविकांकरीता कोणतेही निर्बंध नसतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते त्यामुळे गर्दीमुळे भाविकांची गैरसोय होऊ नयेत यासाठी उपाय योजना करण्यात आल्या होत्या. यात्रेदरम्यान रस्त्यावर असणारी अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यात्रेसाठी कार्यरत असणारे मंदीर व्यवस्थापन, स्टॉलधारक, संबंधित कर्मचारी, ठेकेदार या सर्वांच्या लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत, याची आरोग्य विभागाने खात्री करावी. त्याचबरोबर या यात्रेस खाद्य पदार्थांचे स्टॉल लावणाऱ्या स्टॉलधारकांनी अन्न औषध प्रशासन विभागाची परवानगी घ्यावी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले होते.

