मुंबईमध्ये सन 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटासंदर्भात शरद पवार यांनी मुस्लीम बहुल भागात देखील स्फोट झाल्याची चुकीची माहिती शरद पवार यांनी दिली असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. हा मुस्लिमांचं लांगुलचालन करण्याचा प्रकार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार यांनी एक ट्वीट केले आहे. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी फडणवीस यांनी 14 ट्वीट केले. त्यात त्यांनी हे आरोप केले आहेत.
त्यावर एका ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात शरद पवार यांनी खोटी माहिती दिल्याचे सांगत ते खोटं का बोलले याचंही स्पष्टीकरण दिलं आहे. शरद पवारांनी 12 मार्च 1993 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटच्या दिवशी मुस्लिम बहुल भागात देखील एक स्फोट झाल्याची चुकीची माहिती दिली होती. यासंदर्भात विचारले असता त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, यावर पवारांनी खुलासा केला आहे.
शरद पवार एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना म्हणाले कि, “बॉम्बस्फोट शुक्रवारी झाले. दुपारी बाराच्या सुमारास. मी मंत्रालयात माझ्या कार्यालयात होतो. माझ्या कार्यालयापासून एअर इंडियाची बिल्डिंग अर्ध्या फर्लांगावर आहे. एअर इंडियाच्या तिथेच स्फोट झाले. माझ्या कार्यालयाच्या काचा हलायला लागल्या. माझ्या लक्षात आलं काहीतरी झालं. मी खिडकी उघडली तर तिथे धूर दिसायला लागला. मी कंट्रोल रुमला विचारलं तर बॉम्बस्फोट झाल्याचं समजलं. पाच मिनिटांत लागोपाठ इतर ठिकाणीही स्फोट झाल्याचं कळलं. मी स्पॉटवर जाऊन बघायचं ठरवलं. पण पोलीस आयुक्तांनी मला सांगितलं तुम्ही जागेवरून हलू नका, आम्ही स्पॉटवर जाऊन पाहातो.
काही तासांनी मी एअर इंडियाच्या स्पॉटला गेलो. त्यात आरडीएक्सचं मटेरियल वापरलं होतं. आरडीएक्स तयार करणारा कारखाना फक्त देहूरोडला आहे. मी संबंधित विभागाला विचारणा केली. पण आपल्याकडे दोन वर्षांपासून आरडीएक्स बनत नाही आणि स्टॉकही नाही असं मला कळलं. अर्थात आरडीएक्स इथलं नाही हे मला समजलं. मला लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं की शेजारच्या देशात आरडीएक्स बनतं. त्यामुळे शेजारी देशातून आरडीएक्स आल्याची शक्यता होती. बॉम्बस्फोट झाल्याची ठिकाणं ही हिंदूंची लोकसंख्या असणारी होती. याचा अर्थ हा नियोजित कट असला पाहिजे.



