मुंबई : भाजपकडून वारंवार शिवसेनेच्या हिंदूत्वावर प्रश्न उपस्थित केले जातात. त्यातच आता आम्ही हिंदूत्व सोडलेले नाही, असा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आठ जुन्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराला हिरवा झेंडा दिला. यापैकी अनेक मंदिरं शेकडो वर्षांपूर्वीची आहेत.
रत्नागिरीतील धूतपापेश्वर मंदिर, कोल्हापुरातील कोपेश्वर मंदिर, पुण्यातील एकवीरादेवी मंदिर, नाशिकमधील गोंदेश्वर मंदिर, औरंगाबादचे खंडोबा मंदिर, बीडमधील पुरुषोत्तम भगवान मंदिर, अमरावतीमधील आनंदेश्वर मंदिर आणि गडचिरोलीतील महादेवाचे मार्कंडा मंदिर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे
धूतपापेश्वर मंदिर सुमारे 1,000 वर्षे जुने आहे, तर कोपेश्वर मंदिर 800 वर्षे जुने आहे. एकवीरा देवी मंदिर हे ठाकरे कुटुंबीयांचे कुलदैवत देखील आहे. ते इथं नियमितपणे दर्शनासाठी जातात. तसेच नाशकातील गोंदेश्वर मंदिर पांडवांच्या काळातील आणि ते ९०० वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. खंडोबा मंदिर ९ शतके जुने आहे. पुरुषोत्तम भगवान मंदिर जवळपास १५ शतकं जुनं आहे. राज्यातील एकमेव असलेले आनंदेश्वर मंदिर ८ शतकं जुनं असून मार्कंडा मंदीर देखील अनेक शतकांपूर्वी बांधण्यात आले आहे
कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम सुरू होण्यासाठी या आठ मंदिरांच्या जीर्णोद्धारा या आठवड्यात प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक घेण्यात येणार आहे. या मंदिरांचे मूळ स्वरुप आणि रचना कायम ठेवण्यात येणार आहे. पण, देशाच्या इतर भागातून येणाऱ्या यात्रेकरूंची गैरसोय टाळण्यासाठी नवीन पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.

