मुंबई, 19 एप्रिल : एसटी कामगारांची कोर्टात बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात आज धक्कादायक दावा केला आहे. सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजन्याचं मशीन सापडलं आहे. तसेच सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशांमधून मालमत्ता खरेदी केली. सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या पैशांतून मुंबईच्या परळमध्ये 60 लाखांची जागा घेतली, भायखळ्यातही मालमत्तेची खरेदी केली, तसेच नवी गाडी घेतली, अशी धक्कादायक माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आज गिरगाव कोर्टात युक्तीवाद करताना दिली.
गुणरत्न सदावर्ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पण गावदेवी पोलिसांकडून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जात आहे. कोर्टात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद करताना गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशांमधून मालमत्ता खरेदी केली आहे. त्यांनी केरळमधून 23 लाखांची नवी कोरी गाडी विकत घेतली आहे.
त्यामुळे या सगळ्यांची चौकशी करणं गरजेचं आहे, असं म्हणत प्रदीप घरत यांनी सदावर्तेंच्या आणखी काही दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली आहे. याशिवाय जे आरोपी पोलीस कोठडीत होते ते त्यांचा खरा मोबाईल देत नाहीत. ते तपासाला सहकार्य करत नाहीत, असंही सदावर्तेंनी सांगितलं.



