सांगली, 19 एप्रिल : गेल्या पाच महिन्यापासून एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर अडून बसले होते. अखेरीस न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी कर्मचारी कामावर परतू लागले आहे.
सांगलीमध्ये 300 कर्मचारी कामावर परतले आहे. यावेळी लालपरीला पाहून महिला कर्मचाऱ्यांना रडू कोसळले. न्यायालयाचा आदर राखत सांगलीत 300 एसटी कामगार कामावर रुजू झाले आहेत. आज सर्व कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत एसटी डेपोत जाऊन लालपरीचे स्टेअरिंग सांभाळले.
यावेळी गेली साडेपाच महिन्यापासून लालपरीपासून दूर असल्याने आज लालपरीला पाहून अनेक महिला कर्मचाऱ्यांना रडू कोसळले. यावेळी महिला कर्मचाऱ्यानी लालपरीचे चुंबन घेत लालपरीला मिठी मारत महिलांनी आपल्या अश्रूला वाट दिली. त्यामुळे एसटी डेपोतील वातावरण गहिवरून गेले होते.
याचबरोबर आम्ही सर्व गुणरत्न सदावर्ते यांच्या सोबत आहोत आणि त्यांना आमचा पाठिंबाही राहील अशी घोषणाही केली. बीड विभागातील 736 संपकरी कर्मचारी कामावर परतले दरम्यान, न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर परतण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर कर्मचारी परतू लागले असून त्यांना कामावर रुजू करून घेण्यात येत आहे. आजपर्यंत बीड विभागातील 736 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.
त्यामुळे ग्रामीण भागातील देखिल फेऱ्या हळूहळू सुरू केल्या जात आहेत. 95 टक्के कर्मचारी कामावर परतण्याची चिन्हे आहेत. 22 एप्रिलपर्यंत सर्वच कर्मचारी कामावर रुजू होतील, असा अंदाज आहे. कर्मचारी वाढल्याने बीड विभागातील आठ आगारांतून 348 बसेस सोडल्या जात असून या बसच्या 800 पर्यंत फेऱ्या होत आहेत. दररोज 45 ते 55 हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. साध्या बसशिवाय परिवर्तन, शिवशाही, स्लीपर सीटर बस सुरू केल्या आहेत. यामुळे सध्या लग्नसराई, उन्हाळी सुट्या असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.


