मुंबई : खार पोलिस ठाण्यात भाजप नेते किरीट सोमय्या राणा दाम्पत्यास भेटायला गेले होते. तेव्हा आपल्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. यानंतर सोमय्या यांनी वांद्रे पोलिसांत धाव घेत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना मुंबई पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. सोबतच चार जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शनिवारी (ता. २३) रात्री उशिरा भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलिस ठाण्यात दाखल होताच शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. काच फुटल्यामुळे सोमय्या जखमी झाले होते. यावेळी खार पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करणाऱ्यांमध्ये माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सर्वांच्या समोर होते.



