जिनोमिक सिक्वेन्सिंग तपासणी सुरूच..बी. जे. मेडिकल घेतेय खासगी प्रयोगशाळांमधून नमुने
पुणे, दि. 25 – दिल्ली, हरियाणामध्ये करोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयात 10 मार्चपासून केलेल्या सर्व करोना चाचण्यांचा अहवाल शून्य आला आहे. असे असले तरी बी. जे. च्या प्रयोगशाळेने जिनोमिक सिक्वेन्सिंग थांबवले नसून,”पॉझिटिव्ह’ अहवालांसाठी त्यांनी खासगी प्रयोगशाळांमधून नमुने घेतले आहेत.
अन्य देशांमध्ये आणि भारतातील काही भागातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता चौथ्या लाटेविषयी चर्चा तर येणारच आहे. त्या अनुषंगाने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने जिनोमिक सिक्वेन्सिंग सुरूच ठेवले आहे.
“डेल्टा’ प्रकाराचा अहवाल देणारे बीजे मेडिकल कॉलेज देशातील पहिले ठरले जे अत्यंत महत्त्वाचे होते. आम्ही मार्चमध्ये सुमारे 200-330 नमुन्यांची चाचणी केली जे आता कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या 40 दिवसांपासून आम्ही सुमारे 8000 नमुने तपासले आहेत त्यातील एकाचीही चाचणी पॉझिटिव्ह आली नाही, अशी प्रतिक्रिया बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.
संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे जिनोमिक सिक्वेन्सिंग सुरू ठेवावे लागणार आहे. बदलत्या आणि नव्या व्हेरियंट प्रकारचा शोध हा अविरत सुरूच राहणार आहे. त्यासाठी नमुने गोळा करावेच लागतील. त्याच जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी आता खासगी प्रयोगशाळांमधून नमुने गोळा करत आहोत. त्यातून सुमारे 100 ते 200 चाचण्या रोज करत आहोत.
– डॉ. राजेश कार्यकर्ते, मायक्रोबायोलॉजी विभागप्रमुख