पुणे, दि. 25 – देश अपघातमुक्त होण्यासाठी शासन प्रशासनाबरोबरच मोटार ड्रायव्हिंग स्कूल्सची भूमिका देखील महत्त्वाची आहे. संस्थांनी प्रशिक्षणार्थी उमेदवारांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून जीवितहानी न होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे, असे मत राज्याचे सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, संजय ससाणे, सीआयआरटीचे प्रशांत काकडे, रस्ते वाहतूक तज्ज्ञ दत्तात्रय सस्ते, संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघोले आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत राज्यातील 300 हून अधिक संस्थाचालक सहभागी झाले होते.
रस्ते वाहतूक करताना आपला परिवार सुरक्षित आहे का, याचा नितांत विचार करण्याची गरज आहे. शासन सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करत आहे. वाहन चालकांना वाहतुकीचे नियम, रस्ता सुरक्षा, अपघात होण्याची आणि अपघातामुळे मनुष्य आणि वित्त हानी याबाबत प्रबोधन करण्याची मोटार ड्रायव्हिंग संचालकांनी अंमलबजावणी करावी, असे ससाणे म्हणाले.