मुंबई: खासदार नवनीत राणा आणि त्यांची आमदार पती रवी राणा यांचा खोटारडेपणा उघड करणारा एक व्हिडीओ मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट केलाय. हा व्हिडीओ आहे राणा दाम्पत्याचा. त्यात ते बिसलरीचं पाणी पितायत एवढंच नाही तर पोलीसांनी दिलेली कॉफीही पिताना दिसतायत. रवी राणा हे कॉफीचा एक एक घोट घेतायत तर नवनीत राणा ह्या कॉफी हिसळून त्या घेताना व्हिडीओत दिसतायत. खार पोलीस ठाण्यात पोलीसांनी पाणीही दिलं नाही एवढच नाही तर वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही आणि तेही अनुसुचित जातीच्या व्यक्ती म्हणून असा आरोप राणा दाम्पत्यांनी मुंबई पोलीसांवर केला होता.
Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— sp (@sanjayp_1) April 26, 2022
त्यावरुन गेल्या दोन दिवसात मोठं रान उठलेलं होतं. प्रकरण थेट गृहमंत्रालय आणि लोकसभेच्या सभापतीपर्यंत गेलं. त्यानंतर मुंबई पोलीसांनी राणा दाम्पत्याला नेमकी कशी वागणूक दिली याचा पुरावाच मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्विट केलाय. त्यात ते म्हणतात, आणखी काही बोलण्याची गरज आहे का? या प्रकरणात राणा दाम्पत्य चांगलंच अडचणीत येताना दिसतंय.
नवनीत राणा यांच्या आरोपाची लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेऊन राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नवनीत राणा यांच्या आरोपात काही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता थेट मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलीस ठाण्यातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं हे स्पष्ट दिसत आहे.
व्हिडीओत काय दिसतंय?
12 सेंकदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत रवी राणा आणि नवनीत राणा निवांत बसलेले दिसत आहेत. रवी राणा हे निश्चिंत असल्यासारखं बसले आहेत. त्यांच्यासोबत एर लेडी आहे. तसेच एक अधिकारी बसलेला आहे. तसेच या रुममध्ये एक पोलीस बसलेला आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या समोरच्या टेबलवर बिसलेरी पाण्याच्या बाटल्या आहेत. तसेच रवी राणा हे कॉफी पित असून नवनीत राणा हा आधी कॉफी हिसळताना दिसत आहेत. नंतर त्या ही कॉफी पिताना दिसत आहेत. एखाद्या पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी दोघेही आले असावेत अशा पद्धतीने या दोघांचा या व्हिडीओत वावर दिसत आहे. हा व्हिडीओ ट्विट करून अजून काही बोलायला हवं का? असं खोचक ट्विट संजय पांडे यांनी करून राणा दाम्पत्यांची पोलखोलच केली आहे.
नवनीत राणांचे आरोप काय?
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवरच गंभीर आरोप केले होते. त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रं लिहून हे आरोप केले होते. आपल्याला जेलमध्ये अत्यंत वाईट वागणूक मिळत आहे. 23 तारखेला रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये पाणीही देण्यात आले नाही. तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मी अनुसूचित जातीची आहे, त्यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्क नाकारण्यात आला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता.

