पुणे : सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने दोन समाजात तेढ निर्माण करणे थांबवावे, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाने म्हटले आहे. भोंग्यांच्या प्रकरणावरून मराठा क्रांती ठोक मोर्चाने भोंग्यांच्या वादातही उडी घेतली आहे. भोंगे प्रकरणावरून राज्यात वाद थांबला नाही, तर मराठा क्रांती ठोक मोर्चा रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला आहे.
एकीकडे सध्या राज्यात भोंग्यांचा विषय तापला असून विविध पक्ष आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सदावर्ते यांची सनद रद्द करण्याच्या मागणीसाठी लवकरच बार कौन्सिलच्या अध्यक्षांची भेट घेणार असल्याचेही मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आले आहे.
राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्यात मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे. हा वाद म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. हे जर थांबले नाही, तर मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.


