पुणे : कात्रजच्या जुन्या बोगद्यात गुरुवारी संध्याकाळी एका मोटारीने अचानक पेट घेतला. मोटारीतील चौघे वेळीच बाहेर पडल्याने बचावले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कात्रज अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. या दरम्यान वाहतूक बंद झाल्याने काही काळ कोंडी निर्माण झाली होती.
कात्रज घाट चढून मोटार बोगद्यामध्ये शिरत असतानाच इंजिनमध्ये आवाज झाला. सुरुवातीला इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यामुळे चालकाने मोटार बाजूला घेतली. चालकासह गाडीतील चौघे जण तातडीने खाली उतरले. ते उतरेपर्यंत इंजिनने पेट घेतला होता. संबंधित मोटार पेट्रोल आणि एलपीजी इंधनावर चालत होती. गाडीने पेट घेतला तेव्हा ती एलपीजीवर चालविली जात होती.
कात्रज अग्निशामक दलाचे तांडेल रामदास शिंदे, वाहन चालक भंडारे, मांगडे, पंकज इंगवले यांच्या प्रयत्नातून ही आग आटोक्यात आणण्यात आली.