उत्तर प्रदेशातल्या अयोध्या इथं मोठी दंगल होण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी तीन मशिदींसह चार ठिकाणी आक्षेपार्ह पोस्टर्स, धार्मिक ग्रंथांच्या प्रती आणि डुकराचं मांस फेकण्याच्या आरोपाखाली सात लोकांना अटक केली आहे. या कृतीमागे शहरातलं वातावरण खराब करण्याचा उद्देश असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे – महेश कुमार मिश्रा, प्रत्युष श्रीवास्तव, नितिन कुमार, दीपक कुमार गौर उर्फ गुंजन, बृजेश पांडे, शत्रुघ्न प्रजापती, विमल पांडे. हे सर्व आरोपी अय़ोध्या जिल्ह्यातले रहिवासी आहेत. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून चार आरोपी अद्याप फरार आहेत, पण त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. अटक केलेल्यांची चौकशी केली असता समोर आलं आहे की, त्यांना शहरातलं वातावरण बिघडवायचं होतं.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सध्या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात असून शहरात कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. शहरातल्या तीन मशिदींबाहेर आक्षेपार्ह वस्तू फेकण्यात आल्या होत्या. याशिवाय गुलाब शाह बाबा दर्ग्याच्या बाहेरही या वस्तू फेकण्यात आल्या होत्या.