मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून ओवैसी यांना जसे मुस्लिम मत कापण्यासाठी मैदानात उतरवलं जातं. तसे काही हिंदु ओवैसी शिवसेनेच्या विरुद्ध वापरण्याचं कट कारस्थानाचे षडयंत्र भाजपकडून करण्यात येत आहे. हे षडयंत्र त्यांच्यावरच उलटेल. मराठी माणूस आणि हिंदू समाज हा शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. हिंदु ओवैसी नक्की कोण आहे, हे देश जाणतो. जसं असाउद्दीन ओवैसी यांना देश जाणतो. त्यांना मुस्लिम समाज जसा आता ओळखू लागला आहे. तसाच आता हिंदू ओवैसींनाही हिंदु समाज हळूहळू ओळखायला लागला आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता जहरी टीका केली.
ते म्हणाले की, शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथे होणार आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रवक्त्यांशी संवाद साधला. या वेळी पक्ष संघटनात्मकही चर्चा झाली. जनतेचे प्रश्नं, राज्य सरकार जनतेसाठी करत असलेली विकासात्मक कामे जनतेपर्यंत पोचवणे. सध्या राज्यात ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यावर सखोल चर्चा झाली.


