पुणे : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्मााण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबादची १ मे रोजी होणारी नियोजीत सभा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. शिवाय या सभेला आता पोलिसांकडूनही परवानगी मिळाली आहे. राज ठाकरे यांची यापूर्वीची गुडीपाडव्याची सभा, त्यानंतरची ठाण्यातील उत्तरसभा यामध्ये त्यांनी घेतलेल्या हिंदूत्वाच्या भूमिकेमुळे राज्यभरात वेगळेच वातावरण तयार झाले आहे. त्याचवेळी भाजप-मनसे युतीची चर्चाही दबक्या आवाजत सुरु आहे.
याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची आणि शिवसेना प्रवक्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रवक्त्यांना राज ठाकरेंवर तुटून पडा असे आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे. बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? राम मंदिर यात्रेवेळी राज ठाकरेंचं काय सुरु होतं? त्यांचं हिंदुत्व किती बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा, सडेतोड उत्तर द्या, असे स्पष्ट आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय बैठकीत शिवसंपर्क अभियान आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली आहे.


