सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात १४ वर्षे जुन्या खटल्याप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 2008 मध्ये राज ठाकरे यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल आयपीसीच्या कलम 109 आणि 117 (गुन्हाला प्रोत्साहन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
६ एप्रिल रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करताना सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना मनसे प्रमुखाला अटक करून न्यायालयात हजर करण्यास सांगितले. सहाय्यक सरकारी वकील ज्योती पाटील यांनी सांगितले की, न्यायमूर्तींनी राज ठाकरे आणि दुसरे मनसे नेते शिरीष पारकर यांच्याविरुद्ध अनुक्रमे मुंबई पोलिस आयुक्त आणि खेरवाडी पोलिस ठाण्यात वॉरंट जारी केले.
पुढे असे सांगितले की, न्यायालयाने पोलिसांना 8 जूनपूर्वी वॉरंटची अंमलबजावणी करण्यास आणि दोन्ही नेत्यांना न्यायालयात हजर करण्यास सांगितले आहे. 2008 मध्ये, स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी शिराळा येथे राज ठाकरे यांच्या अटकेच्या विरोधात आंदोलन केले होते.
2012 पूर्वीचे राजकीय खटले मागे घेण्यात यावेत असा सरकारी नियम असल्याचा दावा मनसेच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने केला. मात्र, ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित केल्याने हे प्रकरण गाजत आहे, असेही ते म्हणाले.

