औरंगाबादची राज ठाकरेंची सभा मनसेच्या अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. त्यामुळे पोलिसांनी राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करावी अन्यथा आमचा आणि त्यांचा संघर्ष अटळ आहे, असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे. ही सभा होण्यापूर्वी त्यांनी सभा उधळण्याचाही इशारा दिला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर राज्यातलं वातावरण तापू लागलं आहे. ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे अर्थात आजचा अल्टिमेटम दिल्यानंतर त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. ४ मे अर्थात उद्यापासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, म्हणून आजच आवश्यक ती पावलं उचलण्याचा निर्णय पोलीस विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना देखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला विरोध करणाऱ्या भीम आर्मीने आता मनसेसोबत थेट दोन हात करण्याचा इशारा दिला आहे.
भीम आर्मीकडून राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला विरोध करण्यात आला होता. राज ठाकरेंनी सभेसाठी दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यास त्याच सभेत शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाने घोषणाबाजी करून सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मीने दिला होता. त्यावर सभेदरम्यान उपस्थितांमध्ये काहीसा गोंधळ पाहाताच राज ठाकरेंना भाषण सुरू असतानाच “मनसेच्या सभेत काही वेडं-वाकडं कराल तर चौरंग बनवून घरी पाठवेन”, अशा शब्दांत गोंधळ घालणाऱ्यांची कानउघाडणी केली होती.


