पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंगे काढण्यास सांगितले होते. त्यानंतर झालेल्या उत्तरसभेत देखील मशिदीवरील भोंग्यासाठी अल्टीमेटम दिला. औरंगाबादच्या सभेतही त्यांनी हा मुद्दा लावून धरला. मात्र, यामुळे मनसेचे मुस्लीम कार्यकर्ते राज ठाकरेंवर नाराज आहेत.
पहिल्या सभेनंतरच ठाकरे यांच्या पक्षाला गळती लागली होती. मुंबईसह मराठवाड्यातील ३५ मनसैनिकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पुण्यातही राजीनामे पडले. सुरुवातीला मनसेच्या वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शेहबाज पंजाबी यांनी राजीनामा देत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पंजाबी आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज संजय राऊत यांची पुण्यात सभा पार पडणार आहे. यावेळी ते शिवबंधन बांधणार असल्याचं कळतंय.