मुंबई : (प्रतिनिधी) राजद्रोहाच्या गुन्ह्यात जामीन आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर माध्यमांसमोर येवून बोलणं राणा दांपत्याना महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जामीन देताना न्यायालयाने घातलेल्या अटींचे पालन न केल्याची बाब उद्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत राणा दांपत्याचा जामीन रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे राणा दांपत्यापुढील अडचणी पुन्हा वाढणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल १२ दिवसानंतर त्यांना जामीन मिळाला होता.
जामीन देताना राणा दांपत्याला न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. त्यामध्ये माध्यमांशी न बोलण्याची अट होती. मात्र आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राणा दांपत्यानी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले. विशेष म्हणजे हनुमान चालीसासाठी १४ दिवसच काय तर चौदा वर्षेही तुरुंगवास भोगण्याची तयारी असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलण्याची मनाई केलेली असताना राणा दांपत्यानी न्यायालयाच्या अटीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे सोमवारी याबाबत न्यायालयात अर्ज देवून त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आणून दिले जाणार असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. त्यामुळे आता राणा दांपत्याचा जामीन रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



