पुणे : २०१८ मध्ये राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शरद पवारांनी छगन भुजबळ यांना फुले पगडी घातली होती. त्यानंतर त्यांनी पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचनावजा आदेशच दिला होता. त्यानंतर पुणेरी पगडी विरुद्ध फुले पगडी हा वाद बरेच दिवस राज्यभर गाजत होता. आता शरद पवार यांनी पुणेरी पगडी घातल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यात आयोजित ‘जितो कनेक्ट २०२२’ कार्यक्रमातील ‘प्राईड ऑफ पुणे’ सन्मान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांचा पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातून पुणेरी पगडी हद्दपार केल्याची घोषणाच पवारांनी त्यावेळी केली होती.
तुरुंगातून सुटल्यानंतर याच सभेत छगन भुजबळ यांनी पहिले भाषण केले होते. त्यांच्या भाषणात जात, धर्म, समाज यांना सोबत घेऊन जाऊ असे भुजबळांनी म्हटले होते. त्यानंतर पवारांनी गुगली टाकत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात यापुढे पुणेरी पगडी नको असा हुकूमच देऊन टाकला होता. आता पवारांनी पुणेरी पगडी स्वीकारल्यानंतर हा वाद पुन्हा डोके वर काढणार असे दिसत आहे.



