नाशिक : वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत एक ट्वीट या तरुणानं केलं होतं. दोन दिवसांपूर्वी केलेल्या या ट्वीटवर मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. शरद पवार यांच्याबाबत चुकीच्या भाषेत ट्वीट केल्याप्रकरणी संतापही व्यक्त करण्यात आला होता. अखेर या तरुणाला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जाते आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत या तरुणावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मुंबई पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, मुंबई ठाणे आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत टॅग केलंल. दरम्यान, आता नाशिक पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. बागलाणकर नावाच्या एका ट्वीटर युजरनं हे ट्वीट केलं होतं. नाशिक ग्रामीणच्या दिंडोरी पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे.
वेळ आली आहे बारामचीच्या गांधी साठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची… #बाराचा_काका_माफी_माग‘ असं ट्वीट 11 मे रोजी या तरुणानं केलं होतं. या तरुणानं नाव निखिल भामरे असल्याचं त्याच्या ट्विटर आयडी युजरवरुन लक्षात येतंय. दरम्यान या तरुणाच्या ट्वीटवरुन जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत या तरुणावर कारवाईची मागणी केलेली. शरद पवारांविरुद्ध आक्षेपार्ह भाषेत ट्वीट करणाऱ्या विकृत इसमाविरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यानंतर लगेचच नाशिकच्या दिंडोरी पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलंय

