वाई : किसन वीर सातारा सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी वाई खंडाळा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था सातारा मनोहर माळी यांनी कारखान्यावर बोलावली होती. यावेळी अध्यक्षपदासाठी आमदार मकरंद पाटील व उपाध्यक्षपदासाठी प्रमोद शिंदे यांचा एक एकच अर्ज आल्याने त्यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी जाहीर केले त्यानंतर सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील व सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ यांनी व सर्व संचालकांनी त्यांचा सत्कार केला
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार मकरंद पाटील कारखान्यावर पूर्णपणे मकरंद पाटील यांचेच वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच झालेल्या किसन वीरच्या निवडणुकीत किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने सर्वच्या सर्व म्हणजे २१ जागा जिंकत आमदार पाटील यांनी परिवर्तन घडवले आहे. त्यांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार साडे नऊ हजार मतांच्या फरकांनी विजयी झाले. तर माजी आमदार मदन भोसले यांच्या पॅनेलला भाजपसह शिवसेना आमदार महेश शिंदेंचे पाठबळ मिळून देखील एकही जागा जिंकता आली नव्हती.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशीकांत शिंदे, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि प्रत्यक्ष रणांगणात असलेले आमदार मकरंद पाटील असे चार आमदार व एक सभापतींनी या निवडणुकीत लक्ष घातले होते.खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांवर निर्णय सोपवून मकरंद पाटील यांना अप्रत्यक्ष पाठींबा दिला होता
मदन भोसले यांना कोरेगावचे आमदार महेश शिंदेंसह भाजपचे पाठबळ मिळाले होते. पण तरीही शेतकरी सभासदांनी मकरंद पाटील व नितीन काका या पाटील बंधूंवर विश्वास दाखवत त्यांच्या हातात किसन वीरची सत्ता दिली. आमदार मकरंद पाटील तब्बल १९ वर्षानंतर आज प्रथमच कारखान्यावर आल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कामगार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांची मोठी गर्दी कारखान्यावर झाली होती. फटाके फोडत आणि ढोल-ताशांच्या गजरात आमदार पाटील यांचे कारखान्यावर स्वागत करण्यात आले.पाटील यांनी किसन वीर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर मिरवणुकीने ते कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयात गेले. आमदार पाटील यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.