पुणे: सुकर व पर्यावरणस्नेही प्रवास करतानाच खर्च आटोक्यात आणण्यासाठी एसटी महामंडळ विद्युतवर धावणाऱ्या बसगाडय़ा ताफ्यात दाखल करणार आहे. अशा १५० बस शिवाई नावाने येत्या तीन महिन्यात दाखल करण्याचे उद्दिष्ट एसटी महामंडळाने ठेवले आहे. यातील पहिली बस एसटीच्या वर्धापनदिनी येत्या १ जूनला पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. पुण्यातील स्वारगेट येथे सकाळी ९.३० वाजता लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
एसटी महामंडळाने वर्षभरात भाडेतत्त्वावर एक हजार बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस विद्युतवर धावणाऱ्या असतील. वातानुकूलित तसेच साध्या प्रकारातील बसचा यात समावेश असेल. याव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या फेम योजनेंतर्गत विदयुतवर धावणाऱ्या १५० वातानुकूलित शिवाई बसही ऑगस्टपर्यंत दाखल करण्यात येतील. जुलै २०१९ मध्येसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती.