मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशातच शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली औरंगाबादमधील पहिली सभा आणि औरंगाबाद पालिकेत शिवसेनेला मिळालेले मोठे यश याची आठवण सांगितली आहे. ते बुधवारी (१ जून) औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर माध्यमांशी बोलत होते.
औरंगाबादच्या इतिहासामध्ये प्रथमच बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. त्याच सभेनंतर महानगरपालिकेवर शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. त्याच विराट मैदानावर आता पुन्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन ८ जून रोजी करण्यात आले. या विराट सभेची मोठी तयारी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिली.