मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीने पुन्हा राजकारणाऱ्यांना एकमेकांच्या उंबरे झिझवायची वेळी आणली आहे. जागा सहा आणि उमेदवार सात झाल्याने आता एका जागेसाठी अटीतटीची आणि प्रतिष्ठेची लढत होऊन बसली आहे. तिकडून शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात, सहावी जागा आमचीची निवडून येणार, तर भाजपही या जागेवर आपल्या विजयाचा दावा करत आहे.
अशातच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कोरोना झाल्याने भाजपचा एक मोठा नेता घरी अडकून पडलाय. तर दुसरीकडे मित्रपक्षांनी नाराजीचा सूर लावल्याने शिवसनेनेच्या गोटातलं टेन्शन वाढलं आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी कालच राजकीय बॉम्ब टाकत आपण आपली भूमिका ही मतदानादिवशीच ठरवू असे सांगितले. त्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. तर भाजपकडूनही त्यांच्याकडे चर्चेच्या फैरी सुरू आहेत.
सेनेच्या नेत्यांची चार तास चर्चा…
शिवसेना शिष्टमंडळ आणि बविआ चे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यात 4 तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. मात्र बंद दाराआड झालेल्या चर्चेला यांनी कुटुंबिक चर्चेचे स्वरूप देत काय झाली चर्चा यावर मात्र बोलणे टाळले आहे. राज्यसभा निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी सेना आणि भाजपाने आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.