- ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
- दूरदर्शनच्या मराठी बातम्यांना लोकप्रियता मिळवून देणारा विश्वासार्ह आवाज हरपला
मुंबई, दि. 7 :- “ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनानं दूरदर्शनच्या मराठी बातम्यांना लोकप्रियता मिळवून देणारा विश्वासार्ह आवाज हरपला आहे. मराठी वृत्तनिवेदन, सूत्रसंचालक म्हणून माध्यम क्षेत्रात लीलया संचार करणारं व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. वृत्तनिवेदक म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला प्रदीप भिडे यांच्या आवाजानं चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राचं प्रबोधन केलं. त्यांच्या निधनानं माध्यम क्षेत्रातल्या तरुणांचा मार्गदर्शक हरपला आहे.
माध्यमसृष्टीची मोठी हानी झाली आहे. प्रदीप भिडे यांचा आवाज लाभलेल्या जाहिरातपट, माहितीपटातून ते यापुढेही आपल्याला भेटत राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.



