महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपाने आपल्या आमदारांना एकत्र ठेवले आहे. मत फुटू नये यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना व भाजपामध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील नेमकं कोणाला मतदान करणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती.
मनसेचे आमदार भाजपालाच मतदान करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आता त्यावर शिकामोर्तब झाला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे राज्यसभा निवडणुकीत भाजपालाच मतदान करतील, हे स्पष्ट झालं आहे. शेलार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.



