सांगली : जिल्ह्यातील मुलांना अक्षरओळख करून देण्याबरोबरच संस्काराचे धडे देणाऱ्या शिक्षकांचे अर्थकारण प्रगतिपथावर नेणाऱ्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विश्वनाथ मिरजकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिक्षक समितीच्या गेल्या अकरा वर्षांची सत्ता उलथून टाकण्यासाठी अन्य सर्व शिक्षक संघटना एकत्र आल्या आहेत.
सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सहा हजार १११ शिक्षक सभासद असलेली वार्षिक एक हजार कोटींची उलाढाल असलेली जिल्ह्यातील प्रमुख बँक म्हणून शिक्षक बँकेची ओळख आहे. या बँकेची सत्ता मिळावी यासाठी सत्ताधारी शिक्षक समिती पुरस्कृत पुरोगामी शिक्षक सेवा मंडळ या पॅनेलच्या विरोधात स्वाभिमानी शिक्षक सेवा मंडळ हे पॅनेल मैदानात उतरले आहे. सत्ताधारीविरोधात शिक्षक संघाचे थोरात व शि. द. पाटील हे दोन गट, जुनी पेन्शन हक्क संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक संघटना, खासगी प्राथमिक संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, कास्ट्राईब, आदर्श शिक्षक, बहुजन आदी १२ शिक्षकांच्या संघटना एकत्र आल्या आहेत.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी होणारा गोंधळ हा एखाद्या गावपातळीवरील ग्रामसभेपेक्षा अधिक सरस ठरत आला आहे.



