औरंगाबाद : मध्यतरी कोणीतरी आक्रोश काढला होता. हा आक्रोश मोर्चा पाण्यासाठी नव्हता तर सत्ता गेली म्हणून होता. पाच वर्षे तुम्ही सत्तेत होते. आम्ही तुमच्यासोबत होतो. त्या वेळी या योजनेला किती पैसे दिले होते. का भूमिपूजन करु शकले नव्हते. मात्र निवडणूक आली की काहितरी बोलायचं आणि निवडणूक जिंकून जायचं. निवडणूक जिंकली की तंगवत ठेवायचं हे हिंदूत्त्व बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेलं नाही,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.
मागील अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. शहाराला पाणीपुरवठा होण्यासाठी येथे समांतर जलवाहिनीचे काम सुरु आहे. मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. झारीतल्या शुक्राचार्यांना बाहेर फेका पण औरंगाबाद शहरतील नागरिकांना पाणी द्या. पैशांची कमतरता पडू देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच जलआक्रोश मोर्चा हा पाण्यासाठी नव्हे तर सत्ता गेली म्हणून होता असा टोला भाजपाला लगावला. ते आज औरंगाबादेत जाहीर सभेत बोलत होते.
“मी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की कोणी या योजनेच्या आड येत असेल तर त्यांना बाजूला सारा. मी पैसे सापडू देणार नाही. १९७२ ची एक योजना आहे. गंजून सडून गेली आहे. तिच्यासाठीदेखील मी पैसे देतोय. मागील वर्षी समांतर जलवाहिनीचे मी भूमिपूजन केले होते. मी वचन दिलं होतं की मी स्वत: या योजनेचा पाठवुरावा करेन. मी विभागीय आयुक्त आणि पालिका आयुक्तांना सांगितलं आहे की हातात दांडा घ्या आणि जो कोणी मध्ये येईल त्याला बाजूला काढा,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.



