आग्रा स्थानकापासून काही अंतरावर लोहमार्गावरील वीजवाहिनी तुटल्याने दिल्लीहून मुंबई पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतूक तब्बल चार तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. संध्याकाळी साडेसातनंतर या मार्गावरील गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या. त्यामुळे झेलम एक्स्प्रेससह पुणे आणि मुंबईकडे येणाऱ्या गाड्या अधिक विलंबाने धावत आहेत.
जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेसने पुण्याकडे येत असलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्रा स्थानकाच्या जवळ असताना गाडी अचानक थांबली. सिग्नल किंवा इतर किरकोळ कारणांनी काही काळ गाडी थांबली असेल, असा प्रवाशांचा समज झाला. मात्र, अर्धा ते एक तास उलटल्यानंतरही गाडी पुढे जात नसल्याने प्रवासी हैराण झाले. त्यानंतर काही वेळाने संबंधित मार्गावरील वीजवाहिनी तुटली असल्याची माहिती प्रवाशांना मिळाली. दुपारी ही घटना घडल्यानंतर रेल्वेच्या वतीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. ते पूर्ण झाल्यानंतर हळूहळू एकेक गाडी मार्गावरून रवाना करण्यात आली



